हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ ला अवघे काही महिने राहिले असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे महाविकास आघाडी लोकसभेच्या जागावाटपासाठी बैठका घेत असताना आता शिंदे गट आणि भाजप सुद्धा तयारीला लागला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी रात्री शिंदे गटाच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या २२ जागा लढवण्यावर चर्चा झाल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल शेवाळे म्हणाले, लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काय करायचं याबाबत यावेळी चर्चा झाली. शिवसेनेच्या १३ खासदारांच्या लोकसभेच्या कामाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. १३ खासदारांच्या लोकसभा मतदारसंघांच्या ठिकाणी शिवसेना -भाजपा-आरपीआयचे संयुक्त मेळावे घेण्याचा निर्णय झाला. तसेच यापूर्वी शिवसेनेने ज्या २२ जागांवर लोकसभा निवडणूक लढवली, त्या २२ जागांची तयारी करण्यावर या चर्चा झाली अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधत त्यांचे १३ खासदारांपैकी एकही खासदार निवडून येणार नाही, अशी भविष्यवाणी केली होती. त्याबाबत विचारलं असता लोकसभा निवडणुका या कोणाच्या बोलण्यावर होत नसतात . विकासकामे, आणि बाळासाहेबांचे विचार यामुळे आमचा विजय निश्चित आहे असं राहुल शेवाळे यांनी म्हंटल.