दहिवडी | माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज छाननी करण्यात आली. यामध्ये एकाच उमेदवारांचे 2 अर्ज अवैध झाले असून 18 जागांसाठी तब्बल 100 अर्ज वैध ठरलेले आहेत. यामुळे अर्ज माघारीपर्यंत चित्र कसे निर्माण होणार याकडे माणवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
माण तालुका कृषी बाजार समितीची निवडणुकीसाठी एकूण 102 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी हमाल व तोलाई मतदार संघात दाखल झालेले दोन्ही अर्ज मंगळवारी छाननीत बाद ठरवण्यात आले. सूचक व अनुमोदक नसल्यामुळे हे अर्ज बाद झाले आहेत. हमाल व तोलाई मतदार संघातून गोंदवले खुर्द येथील पंजाबराव आप्पासाहेब पोळ यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु आज छाननीमध्ये दोन्ही अर्ज बाद ठरवण्यात आले.
याबाबत दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तीवाद केला. त्यानंतर निर्णय देताना निवडणूक निर्णय अधिकारी विजया बाबर म्हणाल्या, हमाल व तोलाई मतदार संघात उमेदवार पंजाबराव पोळ हे एकमेव मतदार आहेत. त्यांनी याच मतदार संघातून सूचक व अनुमोदक देणे गरजेचे होते. परंतु तसे घडले नाही. त्यामुळे त्यांचे दोन्ही अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला असून त्यांनी या निर्णयास विरोध केला आहे. वरिष्ठ पातळीवर न्याय मागण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.