हातकणंगले | प्रतिनिधी
ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्य करणे राजू शेट्टी यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. कारण खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लोकसभेची आदर्श आचारसंहिता सुरु असल्याने राजू शेट्टी यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ कलम १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हातकणंगले तालुक्यातील हेर्ले या गावी प्रचार सभेत बोलताना राजू शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या त्या वक्तव्याचा ब्राह्मण समाजाकडून निषेद करण्यात आला होता. जवान सीमेवर लढत असतो तेव्हा तो कोणतीही जात घेवून लढत नसतो. तो भारत मातेचा पुत्र म्ह्णून लढत असतो. मात्र राजू शेट्टी स्वार्थी राजकारणासाठी त्या जवानांची जात काढू लागले आहे असे मत ब्राह्मण समाजाने व्यक्त केले आहे.
राजू शेट्टी यांच्या या वक्तव्या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांकडे ब्राह्मण समाजाच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. त्या तक्रारी वरून राजू शेट्टी यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली होती. या नोटीसीला उत्तर नदिल्याने निवडणूक भरारी पथक ३ चे प्रमुख मेघराज घोडके यांनी राजू शेट्टी यांच्या विरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना महाआघाडीने पाठिंबा दिला आहे. राजू शेट्टी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्याकडे देण्यात आला आहे.