ठाणे प्रतिनिधी । वारंवार सुचना, पत्रव्यवहार करुनही विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहणार्या ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघातील तब्बल ९०० कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रथम प्रशिक्षण वर्गास हजर राहून दुसऱ्या प्रशिक्षणवर्गास गैरहजर राहणाऱ्या सदर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरु झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार होती. त्यानुसार या कामासाठी शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात ६३ लाख २९ हजार ३८५ मतदार आहेत. यामध्ये ३४ लाख ४७ हजार १४८ पुरुष आणि २८ लाख ८२ हजार ४८८ महिला आणि ४६१ तृतीयपंथी आहेत. जिल्ह्यात ६ हजार ४८८ मतदानकेंद्र आहेत. या निवडणुकीच्या कामासाठी ५५ ते ६० हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. यामध्ये २०० व्हिडिओग्राफर्स, ७२ भरारी पथके, ८६७ झोनल अधिकारी व तितकेच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवणारे अधिकारी आहेत. त्यानुसार या कर्मचा:यांना इव्हिएम मशिन हाताळणे, निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडावी यासह विविध गोष्टींची माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक निर्णय कार्यालय स्तारावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पहिल्या प्रशिक्षण वर्गास चांगला प्रतिसाद लाभला होता. मात्र त्यानंतर झालेल्या दुस:या प्रशिक्षण वर्गास अनेकांनी दांडी मारली होती. त्यामुळे आता अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबरोबरच त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिली.
ठाणो जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या कामाचे आदेश रद्द करण्यासाठी सुमारे ७ हजार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले होते. त्यातील ५० टक्के अर्जात अधिकारी आणि कर्मचा:यांनी वैद्यकीय कारणो दिली आहेत. त्यातील खरोखर वैद्यकीय कारणात तथ्य असलेल्या कर्मचा:यांचे आदेश रद्द करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिली.