वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे; फडणवीसांची मध्यस्थी यशस्वी

Electricity workers strike called off
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला 3 दिवसांचा संप आजच्या पहिल्याच दिवशी मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यावरील ऊर्जा संकट टळले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा विभागाचे अधिकारी, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण विभागाचे अधिकारी आणि विविध वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बैठक झाली. या बैठकीनंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला वीज कंपन्यांचे कोणतेही खासगीकरण करायचे नाही, याउलट राज्य सरकार पुढच्या तीन वर्षांमध्ये 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या तीनही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून करणार आहे हे स्पष्ट केलं .

ओडिशा, दिल्ली येथे खासगीकरण झाले आहे, तसे महाराष्ट्रात करण्याचा कोणताही विचार नाही. संघटना आणि सरकारची बैठक यापुर्वीच झाली असती तर गैरसमज निर्माण झालेच नसते. सरकारने मांडलेली भूमिका संघटनांना पटली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न आहेत. कालांतराने त्यावरही तोडगा काढला जाईल अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.