हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर वनविभागाच्या हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरातमधील प्राणी संग्रहालयात हलविण्यात येणार आहे. कमलापूर आणि आलापल्लीतील मिळून ७ हत्ती आता रिलायन्स ग्रुपच्या वतीने गुजरातमध्ये उभारल्या जात असलेल्या प्राणिसंग्रहालयाला दिले जाणार आहेत. ‘अंबानी’ च्या प्रेमापोटी गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव हत्ती कॅम्प बंद करण्याचा घाट राज्य शासनानेच घातल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाच्या ताब्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमधून ७ पैकी ४ हत्ती, तर आलापल्लीतील ३ पैकी ३ हत्ती गुजरातला पाठविले जाणार आहेत. चांगले हत्ती गेल्यानंतर कमलापुरात शिल्लक राहणाऱ्या ३ हत्तींची वंशावळ वाढू शकली नाही तर येथील हत्ती कॅम्पचे अस्तित्वच संपुष्टात येणार आहे.
दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून देशातील सर्वांत मोठे प्राणी संग्रहालय गुजरात येथे सुरु करण्यात येत आहे. सुमारे २५० एकर जागेतील या प्राणी संग्रहालयात देशभरातील विविध ठिकाणचे दुर्मीळ प्राणी नेण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या वने आणि पर्यावरणमंत्रालयाच्या अख्त्यारितील केंद्रीय प्राणी प्राधिकरणाने १२ फेब्रुवारी २०१९ ला रिलायंसच्या या प्राणीसंग्रहालयास मंजुरी दिली आहे.