भाजपमधून राष्ट्रवादीकडे गेलो की वर्षातच मागे ईडीची तारीख पे तारीख; एकनाथ खडसेंची फडणवीसांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “भाजपमध्ये असलो कि चांगले बोलतात. मी चाळीस वर्ष भाजपबरोबर होतो तेव्हा चांगला होतो. आता एका वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलो की पाठीमागे ईडी लावतात आणि तारीख पे तारीख सुरु केली आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता केली.

जळगाव येथील रावेर येथे एका कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, मी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम केले. या पक्षात काम करत असताना पक्षाच्या विस्तारासाठी गाव पातळीवर काम केले.

कोणाच्या मागे कशा ईडीच्या चौकशा लावल्या जाता ते सर्वजण पाहत आहेत. 40 वर्षांमध्ये मीभाजप सोबत चांगला होतो. एक वर्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलो की मागे ईडी लावता. तारीख पे तारीख सुरु करता. ज्या माणसाच्या बळावर तुम्ही इतके दिवस उभे राहीले आणि आता त्याचा अपमान करता. त्याचे फळे तुम्हाला भोगावे लागतील जनता तुम्हाला येणाऱ्या कालखंडात माफ करणार नाही,असा इशारा खडसेंनी यावेळी दिला.

अनेक लोक घडवले, पक्षाच्या माध्यमातून त्यांना मोठे केले. नाथाभाऊच्या आशीर्वादनेच ते मोठे झाले. 40 वर्ष रक्ताचे पाणी करत पक्षासाठी फिरत होते. 30 वर्षापूर्वी एकटा आमदार होतो. पुढे पक्ष वाढत गेला. गावागावामध्ये पक्ष पोहोचला, काय गुन्हा केला मी? असा सवाल यावेळी यावेळी खडसेंनी केला.

You might also like