मुलांच्या स्वप्नांना प्रोत्साहन द्या, त्यांना आवडतंय ते करू द्या – वैष्णवी ढोरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे। सलाम पुणे आणि स्व. सूर्यकांत सर्वगोड सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या वतीने पाटील इस्टेट परिसर येथे बुद्धपौर्णिमेनिमित्त सलाम कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात वैष्णवी ढोरे हिने आपली भरतनाट्यम कला सादर केली. आपल्या संघर्षाबद्दल आणि कलेच्या प्रवासाबद्दल प्रेक्षकांशी तिने गप्पा मारल्या.

‘सलाम पुणे’च्या ‘सलाम कट्टा’ या उपक्रमांतर्गत पुण्यातील कष्टकरी वस्त्यांमध्ये तिथल्या लोकांना उपयोगी असणारे मार्गदर्शनपर कार्यक्रम घेतले जातात. आहार, आरोग्य, रोजगार, कला, शिक्षण, कायदा या विषयांमधले तज्ज्ञ वस्तीतील लोकांशी संवाद साधतात. त्यांच्या शंकांना उत्तरं देतात.

Salam Katta

वैष्णवी ढोरे ही पुण्यातील राऊतवाडी वस्तीतल्या साध्या घरात जन्मलेली मुलगी. पण अडचणींवर मात करत मेहनतीने आणि जिद्दीने ती भरतनाट्यम शिकली. ख्वाडा हा मराठी चित्रपटात ती मुख्य अभिनेत्री म्हणूनही झळकली. वैष्णवीच्या या प्रवासाची दखल ‘सलाम पुणे’ने यू ट्यूब आणि छापील माध्यमातूनही घेतली होती. वस्त्यांमध्ये वैष्णवीचे कार्यक्रम झाले, तरुण मुलींना तिच्याशी बोलण्याची संधी मिळाली तर अनेकींना प्रेरणा मिळू शकते या हेतूने ‘सलाम पुणे’ने तिचे कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं. त्यातलाच एक कार्यक्रम पाटील इस्टेटमध्ये सोमवारी १६ मे रोजी, बुद्धपौर्णिमेला पार पडला.

Salam Katta

कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली. वैष्णवी आणि इतर उपस्थितांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर वैष्णवी आणि मैथिली कुदळे व प्राजक्ता मोरे या तिच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम कला प्रकारातील चार नृत्यांचं सादरीकरण केलं. कार्यक्रम झाल्यावर वैष्णवीने वस्तीतील लोकांना कला क्षेत्रातील करिअरविषयी माहिती दिली. ‘मुलांना त्यांच्या आवडीने काम करू द्या, त्यांच्या स्वप्नांना पालक म्हणून तुम्ही पाठिंबा, प्रोत्साहन द्या’, असं आवाहन यावेळी वैष्णवीने पालकांना केलं. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रेरित होऊन कष्टकरी बांधवांच्या मुला-मुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रातील करिअरच्या वाटा निवडाव्यात, त्यात झोकून देऊन काम करावं’, असंही ती म्हणाली.

नृत्य सादरीकरण झाल्यानंतर ते आवडलेल्या स्थानिकांनी वैष्णवीची भेट घेऊन तिच्याशी गप्पा मारल्या, सेल्फी काढले. वैष्णवीचं नृत्य आवडलेल्या चिमुकल्यांनी तिला बक्षीस म्हणून पैसेही देऊ केले. त्यामुळे वैष्णवी आणि सहकारी भारावून गेले.

Salam Katta

या कार्यक्रमासाठी पाटील इस्टेट परिसरातील जवळपास १५० नागरिक उपस्थित होते. यामध्ये लहान मुलं, महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. ‘वस्ती पातळीवर भरतनाट्यमसारखे कार्यक्रम होतायत, ही गोष्ट आमच्यासाठी नवीन आहे. वैष्णवीच्या कार्यक्रमामुळे आमच्या वस्तीत ही कला शिकण्याची आवड निर्माण होईल’, असं मत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील सर्वगोड यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाच्या नियोजनात ‘सलाम पुणे’तर्फे मयूर कोल्हे यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment