काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल ‘ईडी’ चौकशीच्या फेऱ्यात; ३ अधिकाऱ्यांचे पथक धडकले घरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते अहमद पटेल सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) फेऱ्यात आले आहेत. संदेसरा समूहाच्या ५ हजार कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अहमद पटेल यांची चौकशी करण्यासाठी शनिवारी ईडीचे पथक अचानक त्यांच्या घरी धडकले. प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी ‘ईडी’च्या ३ अधिकाऱ्यांचे पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतील मदर तेरेसा क्रिसेंट निवासस्थानी दाखल झाले. सध्या ‘ईडी’च्या पथकाकडून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे.

अहमद पटेल हे संदेसरा बंधुंच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. यापूर्वी ‘ईडी’कडून अहमद पटेल यांच्या जावयाचीही चौकशी करण्यात आली होती. यानंतर ‘ईडी’कडून अहमद पटेल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊनचे कारण पुढे करून अहमद पटेल यांनी चौकशीसाठी हजर राहणे टाळले होते. मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. त्यामुळे सरकारी नियमावलीनुसार मी चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचे अहमद पटेल यांनी ‘ईडी’ला कळवले होते. त्यामुळे आता ‘ईडी’कडून एक पथक त्यांच्या घरी पाठवण्यात आले.

काय आहे संदेसरा समूह आर्थिक गैरव्यवहार प्रकरण?
स्टर्लिंग बायोटेक ही गुजरातस्थित कंपनी आहे. या कंपनीवर आंध्रा बँकेत गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मोठी नावे गुंतल्याची शक्यता आहे. तब्बल १४ हजार ५०० कोटींच्या गैरव्यवहारात स्टर्लिंग बायोटेकचे मुख्य प्रवर्तक नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा प्रमुख आरोपी आहेत. हे सर्वजण सध्या फरार आहेत. ईडीच्या तपासात संदेसरा समूहाने भारतीय बँकांच्या परदेशांतील शाखांमधूनही तब्बल ९ हजार कोटींचे कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे पैसे बनावट कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्यात आले. काही दिवसांपूर्वीच ईडीने संदेसरा समूहाची परदेशातील ९७७८ कोटींची संपत्ती जप्त केली होती. यामध्ये नायजेरियातील तेल खाणी, विमाने, जहाजे आणि लंडनमधील घराचा समावेश आहे.
संदेसरा समूहाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावाने भारतामध्ये २४९ आणि परदेशात ९६ बनावट कंपन्या सुरु केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातूनच पैसा इतरत्र वळवला जायचा आणि सरतेशेवटी तो नायजेरियात आणला जायचा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment