हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भ्रष्टाचार करायचाच असेल तर त्यासाठी लोकं कोणती शक्कल लढवतील आणि काय करतील याचा काय नेम नाही. अशीच एक घटना बिहार येथे घडली असून एका पट्ट्याने रेल्वेच्या मालकीचे इंजिन विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर्णिया कोर्ट स्थानकामध्ये मागील अनेक वर्षांपासून उभे असणारे रेल्वेचे जुने वाफेवर चालणारे इंजिन या इंजिनीअरने परस्पर विकून टाकले आहे. शेडमधील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.
हे जुने वापरत नसलेले इंजिन अनेक वर्षांपासून पूर्णिया कोर्ट स्थानकामध्ये उभे होते. हे इंजिन विकण्यासाठी इंजिनिअर राजीव रंजन झा याने डीएमआयची सही, शिक्का असलेला खोटा कागद दाखवून हा व्यवहार केला. हे बिंग फुटू नये म्हणून एका पोलिसाच्या मदतीने रेल्वेच्या शेडमध्ये एका पिकअप व्हॅनची नोंदही करून घेतली. मात्र, या शेडमधील शिपायाने केलेल्या तक्रारीनंतर या घोटाळ्याचा भांडाफोड झाला.
१४ डिसेंबर २०२१ रोजी इंजिनीअर राजीव रंजन झा यांनी हेल्पर सुशील यादवच्या मदतीने गॅस कटरच्या मदतीने जुन्या इंजिनचे काही भाग कापत होते. यावेळेस तेथे नियुक्त असणारे प्रभारी एम. एम. रहमान यांनी या कामासंदर्भात विचारणा केली असता इंजिनीअरने खोटं पत्र दाखवून या इंजिनाला भंगारात काढण्यात आलं असून त्याचे भाग पुन्हा डीझेल शेडमध्ये पोहचवायचे असल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी संगीता या देखरेख करणाऱ्या दुसऱ्या शिपाई कामावर पोहचल्या तेव्हा त्यांनी रजिस्टरमधील नोंदी तपासून पाहिल्या. त्यामध्ये एक भंगार पिकअप करणारी व्हॅन आल्याचं नमूद करण्यात आलेलं. मात्र नंतर संगीता यांनी डिझेल कारशेडमध्ये तपास केला असता या इंजिनचं भंगार तिथे पोहचलं नव्हतं. यासंदर्भातील माहिती संगीता यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. तपास केला असता डीएमआयने इंजिन भंगारात काढण्याचे आदेश दिलेच नसल्याचं स्पष्ट झालं.
खोटा आदेश दाखवून इंजिन कापण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंजिनीअरचा अता शोध घेतला जात आहे. तसेच ज्या पिकअप व्हॅनची नोंद करण्यात आली तिचाही शोध घेतला जात आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर डीआरएमच्या आदेशानुसार संबंधित इंजिनीअर, हेल्पर आणि डीझेल कारशेडवर तैनात असणाऱ्या वीरेंद्र द्विवेदी यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलंय.