नवी दिल्ली । एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने ऑनलाइन फसवणुकीच्या धोक्याबाबत EPFO चे सदस्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. EPFO ने ट्विट केले आहे की, पेन्शन फंड संस्थेचा सदस्य म्हणून दाखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने तुमच्या खात्याशी संबंधित किंवा अन्य गोपनीय माहिती मागितली तर ती अजिबात देऊ नका. EPFO ने सांगितले की,’संस्था फोन कॉल्स किंवा सोशल मीडियाद्वारे ग्राहकांकडून आधार, पॅन, UAN, बँक खाते किंवा OTP सारखी माहिती विचारत नाही.’ तसेच EPFO ने सबस्क्राइबर्स सुरक्षित कसे राहू शकतात याबाबत सांगितले.
PF खात्यांवर फिशिंग हल्ले होतात
EPFO ने म्हटले आहे की, कोणताही सदस्य संस्थेच्या कोणत्याही सर्व्हिसेससाठी WhatsApp किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पैसे जमा करण्याची मागणी करू शकत नाही. तसेच सदस्यांनी वैयक्तिक आणि गोपनीय माहिती मागणाऱ्या कॉल्स किंवा मेसेजकडे लक्ष देऊ नये किंवा कोणत्याही EPFO सदस्याला पैसे ट्रान्सफर करू नयेत, असेही म्हटले आहे. बहुतेक वेळा PF खाती फिशिंग हल्ल्यांना बळी पडतात. यामध्ये गुन्हेगार वैयक्तिक माहिती मिळवून पेन्शन फंड फोडतात.
मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल
भविष्य निर्वाह निधी संघटनेने सांगितले की,” नोकरी बदलणारे कर्मचारी सायबर हल्ल्यांना सर्वाधिक बळी पडतात. त्यामुळे त्यांना नक्कीच अधिक सावध राहण्याची गरज आहे. सदस्यांना कोणतेही फिशिंग कॉल किंवा मेसेजेस मिळाल्यास, त्याबाबत त्वरित तक्रार करा. EPFO च्या सर्व्हिस चार्ज फक्त अधिकृत चॅनेलद्वारेच भरा. पैसे देण्याची कोणतीही अनधिकृत मागणी ही सायबर गुन्हेगारांची कृती असेल. यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागू शकतो.”
केंद्राने कर्मचाऱ्यांना दिली दिवाळी भेट
या आठवड्यात, केंद्र सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.5% दराने PF व्याजदरांना मान्यता दिली आहे. दिवाळीपूर्वी EPFO च्या 5 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यापूर्वी मार्च 2020 मध्ये केंद्र सरकारने PFवरील व्याजदर 7 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणून 8.5 टक्के केले होते. 2018-19 या आर्थिक वर्षात पीएफवरील व्याजदर 8.65 टक्के करण्यात आला.