लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी गावनिहाय आरोग्य दक्षता समितीची स्थापना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. ही लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी व लसीकरण पथकांना सहकार्य करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गावनिहाय आरोग्य दक्षता समितीची स्थापणा केली आहे. या समितीचे अध्यक्ष सरपंच असणार असून ग्रामसेवक सदस्य सचिव असणार आहेत. समिती सदस्यामध्ये उपसरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस पाटील, आशा कार्यकर्ता, तलाठी, कृषी सेवक, बी.एल.ओ, अंगणवाडी सेविका यांचा समावेश असणार आहे.

कोविड लसीकरण करुन घेण्यासाठी गावकऱ्यांचे प्रबोधन करुन त्यांना लसीकरण करुन घेण्यासाठी प्रवृत्त करणे आणि सर्व पात्र नागरिकांचा पहिला व दुसरा कोविड लसीकरण डोस निर्देशित केलेल्या मुदतीत पूर्ण करुन घेणे, शंभर टक्के लसीकरण करुन घेण्यासाठी क्षेत्रीय आरोग्य यंत्रणेला आवश्यक ती सर्व मदत करणे, सर्व यंत्रणा मुख्यालयात राहत असल्याची खात्री करणे अशी या समितीची जबाबदारी असणार आहे. या समितीचा कालावधी आदेशापासून 4 महिन्यांपर्यत राहिल व आवश्यकतेप्रमाणे समितीस मुदतवाढ देण्यात येईल.

वरील कामकाजात दिरंगाई, हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुध्द साथरोग नियंत्रण कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापण कायदा 2005 अंतर्गत आदेशाचे पालन न केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच वरील कामकाजात दिरंगाई, हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा करणाऱ्या सरपंच व उपसरपंचाविरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमन 1958 चे कलम 45 (1) मधील गा्रमसुचीत नमुद  आरोग्य विषयक जबाबदारी पार न पाडल्याबद्दल सदर अधिनियमाच्या कलम 39 (1) नुसार अपात्रतेची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असेही सदर आदेशामध्ये नमुद करण्यात आलेले आहे.

Leave a Comment