पाकिस्तानी वंशाच्या व्यक्तीकडून इंग्लंडमधील गुरूद्वारामध्ये तोडफोड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडमधील डर्बी येथील गुरुद्वारा येथे तोडफोडीची घटना उघडकीस आली आहे. तोडफोड करणारा आरोपी हा पाकिस्तानी मूळचा आहे. त्याला लगेच अटक करण्यात आली आहे. या तोडफोडीची संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. डर्बीचे गुरू अर्जुन देव जी या गुरुद्वारामध्ये तोडफोड करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे, मात्र अटक होण्यापूर्वी त्याने गुरुद्वारामध्ये प्रचंड गोंधळ घालून तोडफोड केली.

सोमवारी सकाळी तोडफोड झाल्यानंतर जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा गुरुद्वाराच्या दारात त्यांना एक चिठ्ठी सापडली. इंग्रजीत लिहिलेली ही चिठ्ठी काश्मीरविषयी होती, ज्यात असे लिहिले होते की, “काश्मीरमधील लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करा अन्यथा सर्वत्र अशीच परिस्थिती उद्भवतील”. या चिठ्ठी मध्ये एक फोन नंबरही लिहिलेला होता. या तोडफोडीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून यात आरोपी पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायजम्यामध्ये दिसला आहे.

आरोपीने गुरुद्वाराच्या काचेच्या खिडक्या तोडल्या. इंग्लंडमधील या घृणास्पद घटनेनंतर शीख समुदायामध्ये प्रचंड संताप व्यक्त होतो आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत ट्विट केले आहे की, “मानवतेला टिकवून ठेवण्यासाठी अशी असहिष्णुता आणि द्वेष संपलाच पाहिजे. विशेषत: जेव्हा जग एका अभूतपूर्व संकटाने ग्रस्त आहे.”

अकाली नेते आणि दिल्ली गुरुद्वारा शीख व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना इंग्लंडमधील शिखांविरूद्धच्या या द्वेषाच्या गुन्ह्याचा मुद्दा उपस्थित करण्याचे आवाहन केले आहे.

मात्र, इंग्लंडमध्ये शिखांच्या अशा धार्मिक स्थळाला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने या हल्ल्यानंतर गुरुद्वाराच्या सुरक्षेत वाढ केली असून अशी कोणतीही घटना यापुढे होणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.