सांगली | जिल्ह्यातील 45 वर्षावरील नागरिकांसाठी सरकारकडून पाच दिवसाच्या खंडानंतर बुधवारी सकाळी 18 हजार चारशे लशी दाखल झाल्या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य भांडारातून तातडीने महापालिकेसह, जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांना तातडीने वाटप झाले. दुपारनंतर लसीकरणाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत बहुतांश केंद्रावरील लस संपली. शिल्लक लसी गुरुवारी तासाभरात संपतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागातून देण्यात आली. त्यामुळे पुन्हा लसीची प्रतिक्षा कायम असणार आहे.
जिल्ह्यात कोरोना लसींचा साठा संपल्याने सलग पाचव्या दिवशी लसीकरण ठप्प झाले होते. लस संपल्याने केंद्रावरती नागरिक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्यात बाचाबाची होत होती. अखेर लस दाखल झाल्याने केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु लसीची संख्या कमी आणि लस घेण्यासाठी गर्दी होत आहे.
बुधवारी लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लसीचा कोटा अंतिम टप्यात आला आहे. जिल्ह्यातील 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी केवळ 7 हजार पाचशे लसी आल्या होत्या. सांगली दोन केंद्र तर इस्लामपूर, विटा आणि कवलापूर अशा पाच ठिकाणी लसीकरण सुरु आहेत. त्यांचीही ऑनलाईन नोंदणी सध्या होत नाही. लसीचे पोर्टलही बंद करण्यात आले आहे.