Saturday, March 25, 2023

बीडमध्ये देखील ऑक्सिजन बंद झाल्याने 6 रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांनी केला गंभीर आरोप

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिक येथे झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सीजन टँकर लीक झाल्यामुळे तब्बल 22 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. असे असताना बीडमध्ये देखील ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

बीड येथे अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अर्धा तास ऑक्सिजन खंडित झाल्याने 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. नातेवाइकांनी याबद्दल आरोप केला आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला आहे.

- Advertisement -

ऑक्सिजनचा पुरवठा अर्धा तास खंडित झाल्याने बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. ऑक्सिजन अभावी बीड जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. परळी पाठोपाठ आता अंबाजोगाई मधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात देखील ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. 2 आणि 3 वॉर्डात ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र हा आरोप आंबेजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी फेटाळला आहे.

रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा घटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या रुग्णालयात ऑक्सिजनची बेड संख्या 225 असून दररोज 800 सिलेंडरची मागणी आहे मात्र ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने लातूर, बीड या ठिकाणाहून ऑक्सिजन मागवण्यात आले आहेत. परंतु पुरवठा कमी असल्याने प्रशासन देखील आता हतबल झाले आहे.