हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पभारत दौऱ्यावर येत आहेत. ट्रम्प यांच्या चाहत्यांची गुजरातच्या अहमदाबादमध्ये भव्य तयारी सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक चाहते आहेत. मात्र भारतातही ट्रम्प यांचा एक मोठा चाहता आहे. बूसा कृष्णा असं डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतातील चाहत्याचं नाव असून तो तेलंगणातील जनगावमध्ये राहतो. बूसा कृष्णा हा ट्रम्प यांना देव मानत असून त्याने घराबाहेर त्याची एक मूर्ती देखील उभारली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये असतील. त्यांच्या दौऱ्यावर 100 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. ट्रम्प भारत दौऱ्यावर आल्यानंतर बूसा कृष्णाची त्यांना भेटण्याची इच्छा आहे. केंद्र सरकारकडे त्याने यासाठी विनंतीही केली आहे. गेल्या वर्षी घराबाहेर बूसा कृष्णाने ट्रम्प यांची 6 उंचीची मूर्ती बसवली आहे. तो दररोज मूर्तीची पूजा करतो. विशेष म्हणजे ट्रम्प यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून दर शुक्रवारी त्याचं खास व्रत असतं.
‘भारत आणि अमेरिकेचे संबंध असेच चांगले आणि मजबूत राहावेत असे मला वाटते ट्रम्प यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी आठवड्यातून एकदा दर शुक्रवारी व्रत ठेवतो. त्यांचा एक फोटोही माझ्यासोबत सतत असतो’ असं बूसा कृष्णाने म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधल्या झोपड्यांसमोर भिंत उभारल्याची घटना ताजी असताना नव्या मोटेरा स्टेडियमच्या परिसरात राहणाऱ्या 45 कुटुंबांना घरं रिकामी करण्याची नोटीस अहमदाबाद महानगरपालिकेनं पाठवली आहे.