औरंगाबाद | यंदाही कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे औरंगाबादकरांचा गुढीपाडवा खरेदीविनाच साजरा करावा लागला. राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे मंगळवारी बाजारपेठा बंद होत्या. मात्र काही भागात इलेक्ट्रॉनिक्स व सराफ व्यापार्यांनी दुकानांचे अर्धे शटर उघडी ठेवून काहीसा व्यवसाय केला. मात्र निर्बंधांमुळे बाजारपेठा बंद असल्याने कोट्यावधींचे नुकसान झाल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
प्रथेनुसार हिंदू नववर्षाचा पहिला दिवस हा गुढीपाडवा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वाहने, सोने, इलेक्टॉनिक्स गृहउपयोगी वस्तू, नवीन कपड्यांची खरेदी ही शुभ मानली जाते. त्यामुळे दरवर्षी या दिवशी शहरात कोट्यावधींची उलाढाल होते. या दिवसाची व्यापारी वर्गाला वर्षभर प्रतिक्षा असते. यंदाही शहरातील व्यापार्यांनी पाडव्यासाठी कोट्यवधी रुपयांचा माल खरेदी करून दुकानांत थाटला होता. मात्र वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लादले. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठातील सर्वच दुकाने ठेवण्यात आली. त्यामुळे सलग दुसर्या वर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर होणारा व्यवसाय बुडीत निघाला. गुढी पाडव्याच्या दिवशी मंगळवारी शहरातील बाजारपेठांतील दुकाने बंद होती. वाहन बाजार, सराफा मार्केट, इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. सोमवारी बाजारपेठ उघडण्याचा डाव व्यापार्यांनी आखला होता. मात्र तो पोलिसांमुळे फसला. त्यामुळे मंगळवारी पाडवा असूनही बहुतांश व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवणेच पसंत केले.
तीनशे कोटींची उलाढाल ठप्प
लॉकडाऊन लागू होणार असल्याने पुर्व तयारीसाठी दोन दिवस बाजारपेठ खुली ठेवण्याची विनंती व्यापार्यांनी केली होती. मात्र सोमवारी प्रशासनाने दडपशाही करुन उघडलेली दुकाने बंद केली. त्यामुळे मंगळवारी पाडव्याचा शुभमुहूर्त असूनही बाजारपेठ बंद राहिली. परिणामी, सुमारे अडीशे ते तीनशे कोटींची होणारी उलाढाल होऊ शकली नाही, असे जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले.