मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. योगायोगाने आजचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सगळ्या खासदारांची वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. या सर्व घडामोडींनंतर महाराष्ट्रात सुद्धा राजस्थान आणि मध्यप्रदेशसारखी राजकीय संकट निर्माण होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला.
दरम्यान, शिवसेना खासदारांच्या उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीबाबत खासदार संजय राऊत यांना विचारले असता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले आहेत. त्याच्याशी आमच्या बैठकीचा काहीही संबंध नाही. राजकीय घडामोडी काहीही सुरू नाहीत. सबकुछ आलबेल है…और आलबेल रहेगा. हे सरकार ५ वर्ष चालेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांची मत जाणून घेतली. राजकीय प्रादूर्भाव होणार नाही, कारण आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत. आमचं सरकार ५ वर्ष टिकेल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, असं ठामपणे संजय राऊत यांनी सांगितलं. कोकणामध्ये गणपती उत्सवाबाबत काय भूमिका घ्यावी, यावरही चर्चा झाली. बऱ्याच कालावधीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. शिवसेनेचे खासदार एकत्र आले. चर्चेचा मुख्य विषय कोरोनाच्या उपाययोजना होता, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अमित शहा यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कुठलंही स्वारस्य नसल्याचा पुनरुच्चार केला. अमित शहा यांच्या भेटीतील चर्चेचे विषय महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आणि शेतकऱ्यांना करायची मदत असे होते. यामध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता असं देवेंद्र फडणवीस यांनी भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”