अब हिंदू मार नही खायेगा या चंद्रकांतदादांच्या विधानाच्या भरवशावरच सगळे लढले; अनिल बोंडेंची कबूली

मुंबई : अब हिंदू मार नही खायेगा असं दादा म्हणाले अन् त्याच भरोशावर सगळे लढले असं विधान माजी मंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजित भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकित बोंडे यांनी सदर वक्तव्य केले आहे. यामुळे भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळेच दंगल उसळली काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यावेळी बोलताना, अब हिंदू मार नही खायेगा असं दादा तुम्ही म्हणाले अन् बसं तेवढंच पाहिजे होतं. दादा तुम्हाला सलाम करु वाटतो. तुमच्या याच विधानाच्या भरवशावर सगळे लढले असं बोंडे म्हणाले. तसेच अनिल बोंडे यांनी यावेळी नवाब मलिक यांच्यावरही निशाणा साधला. हिंदू एकवेळ भडकला तर शंकराचा तिसरा डोळा उघडल्याशिवाय राहत नाही. अन् शिवशंभोने जर तिसरा डोळा उघडला तर मलिक अन् त्यांचा बोलवत्या धन्याचा भस्म झाल्याशिवाय राहणार नाही असं बोंडे म्हणालेत.

दरम्यान, शिवसेना राष्ट्रवादीचं हे सरकार उलथून टाकण्याचं लोकांनी ठरवलेलं आहे. संतप्त हिंदूंच्या भावनाही सरकार विरोधात आहे. तेव्हा पुन्हा शिवशाहीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वात आलं पाहिजे अशी मी आई भवानीचरणी प्रार्थना करतो असं बोंडे म्हणाले.

अमरावती हिंसाचार प्रकरणी माजी कृषीमंत्री आणि भाजप नेते डॉ अनिल बोंडे यांना काल (१५ नोव्हेंबर) अटक करण्यात आले होते. बोंडेंसह भाजपच्या १४ जणांवर दंगल भडकवणे आणि दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे या कलमा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु अवघ्या काही तासा बोंडेंसह १४ जणांना जामीन देखील मंजूर करण्यात आला.

दरम्यान, त्या दिवशी काही शिवसैनिकही आले होते. मात्र ते येताना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो घेऊन आले. ते जर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंचा फोटो घेऊन आले असते तर लोकांनी त्यांना येऊ दिलं नसतं. कारण लोकांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर विश्वास आहे उद्धव ठाकरेंच्या नाही असंही बोंडे यावेळी बोलताना म्हणाले.

You might also like