देशात कोणीही परदेशी नाही, सगळे जण हिंदूंचेच पूर्वज; मोहन भागवंतांचं प्रतिपादन

नवी दिल्ली । ”आज देशात कोणीही परदेशी नाही. सगळे जण हिंदू पूर्वजांचेच वंशज आहेत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणालेत. सरसंघचालक काल दिल्लीत एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी त्यांना हिंदू समाजाबद्दल महत्त्वाचं विधान केलं. ”मुस्लिमांसोबत एकता स्थापन करण्याच्या प्रक्रियेला विस्थापित करण्याचा प्रयत्न औरंगजेबानं केला. आज देशात कोणीही परदेशी नाही. सगळे जण हिंदू पूर्वजांचेच वंशज आहेत. कोणी आपल्याला बदलेल याचं भीती नाही. पण या गोष्टी आपण विसरून जाऊ याची भीती आहे,’ असं सरसंघचालक यावेळी म्हणाले.

”हिंदुत्व म्हणजे सत्यासाठी सातत्यानं होणारं संशोधन असं महात्मा गांधी म्हणायचे. हे काम करता करता आज हिंदू समाज थकला आहे. तो झोपी गेला आहे. परंतु ज्यावेळी तो जागा होईल, त्यावेळी आधीपेक्षा अधिक ऊर्जेनं कामाला लागेल आणि सगळं जग प्रकाशमान करेल”, असं प्रतिपादन भागवत यांनी केलं. यावेळी भागवत यांनी इतिहासात देशावर झालेल्या आक्रमणांचा संदर्भ देत देशाच्या समरसतेवर भाष्य केलं. ‘संपत्ती मिळवण्याच्या हेतूनं आक्रमक शक्तींनी भारतावर हल्ले केले. शक हूण कुषाण आले. पण ते आपल्यामध्ये सामावून गेले. त्यानंतर इस्लाम वेगळ्या स्वरुपात आला. जो आमच्यासारखा होईल, तोच राहणार. जो आमच्यासारखा होणार नाही, त्याला राहण्याचा अधिकार नाही, अशी त्यांची भूमिका होती,’ असं भागवत म्हणाले.

‘मुस्लिम आक्रमकांनी आपल्या संस्कृतींच्या प्रतिकांची मोडतोड केली. त्यांच्याविरुद्धची लढाई दीर्घकाळ चालली. लढाईमुळेदेखील संबंधांस कारण ठरते. त्यामुळेच आक्रमणकर्त्यांवरदेखील भारतीय संस्कृती आणि परंपरांचा प्रभाव पडू लागला. समरसतेची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये दाराशिकोहसारखे लोक सहभागी झाले. त्यांनी वेदांचा अभ्यास केला. त्यांचा अनुवाद केला,’ असं भागवत यांनी म्हटलं.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

 

You might also like