हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात चांगल्या वाईट घटना घडत असतात, त्यावर प्रतिक्रिया देताना प्रत्येकाने समाज तोडणारी नव्हे तर समाज जोडणारी भाषा करायला हवी. प्रत्येकाने मनात असलेली भेदभावाची भावना बदलली पाहिजे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते नागपूर येथे दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
मोहन भागवत म्हणाले, “”हे वर्ष आपल्या स्वातंत्र्याचं ७५ वं वर्ष आहे. १५ ऑगस्ट १९४७ आपण स्वतंत्र झालो. आपण आपला देश पुढे नेण्यासाठी देशाची सूत्रं हाती घेतली. हे एका रात्रीतून मिळालेलं नाही. स्वतंत्र भारताचं चित्र कसं असावं हे भारताच्या परंपरेनुसार समान कल्पना मनात ठेऊन देशाच्या सर्व जातीवर्गातील वीरांनी तपस्या, त्याग आणि बलिदानाचे हिमालय उभे केले.”
कोरोनाकाळात मुलांकडे मोबाईल आला. पण त्याचा वापर कशासाठी केला जातोय हे कोणीही पाहत नाही. देशातील तरुण ड्रग्जच्या प्रसाराला बळी पडतात. त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता वाढतेय, नवीन तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर केला जातोय. त्यामुळे त्यावर नियंत्रण आणायला हवं. असेही मोहन भागवत म्हणाले.
प्रत्येकाने मनात असलेली भेदभावाची भावना बदलली पाहिजे. व्यवस्था चालवणाऱ्याच्या मनात भेदभाव नसेल तर खरा उद्देश सफल होतो असं मोहन भागवत यांनी म्हंटल.