अहमदनगर | माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचे आज करोनामुळे निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मागील काही दिवसांपासून ते दिल्लीतच वास्तव्यास होते. प्रकृतीच्या तक्रारींमुळं त्यांनी अलीकडेच करोना चाचणी करून घेतली होती. ती चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले होते. तिथं काल दुपारपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे.
अहमदनगर भाजपचा चेहरा असलेल्या दिलीप गांधी यांच्या राजकारणाची सुरुवात पालिका निवडणुकीपासून झाली होती. सुरुवातीला ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांची महापालिकेत भाजपच्या नेतेपदी निवड झाली. १९९९ साली अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची संधी त्यांना मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. ते खासदार झाले. जानेवारी २००३ ते मार्च २००४ या काळात त्यांनी केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री पद भूषवले होते. त्यानंतर २००९ व २०१४ साली ते पुन्हा एकदा लोकसभेवर गेले होते. २०१४ साली मोदी लाट असताना दिलीप गांधी यांनी तब्बल २ लाख मतांच्या फरकानं प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली होती.