औरंगाबाद – सध्या देशभरात कोरोना लसीकरण सुरु आहे. यास नागरिक देखील उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत. परंतु लसीच्या कमतरतेमुळे प्रत्येकाला लास उपलब्ध होणे शक्य नाही. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या काळाबाजाराच्या अनेक घटना याआधी उघडकीस आल्या आहेत. यातच आता औरंगाबादेत देखील लसींचा काळाबाजार होत असल्याचे उघडकीस आले आहे. शहराजवळच असलेल्या साजापूर भागात कोरोना लसीचा काळाबाजार करणाऱ्या आरोग्य सेवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेश दुरोळे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून लसीचा साठा जप्त केला आहे. प्रत्येकी ३०० रुपये घेऊन कामगारांना एका खोलीत बोलावून तो लस देत असल्याची माहिती येत आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, औरंगाबादमध्ये सध्या कोरोना लसीचा सातत्याने तुटवडा आहे. अशा परिस्थितीत लसीचा हा काळाबाजार पुढे आला आहे. औरंगाबाद ग्रामीण भागातील एका लसीकरण केंद्रातील लस बाहेर आणत ती लस वाळूजपासून दूर साजापूर भागातील एका खाजगी जागेत लस देण्यात येत होती, अशी माहिती येथील नागरिकांनी पोलिसांना दिली. लस देणारा आरोग्यसेवक हा जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आहे.
या ठिकाणी पोलिसांना वापरलेले १० इंजेक्शन आढळून आले आहेत. आधार कार्ड आधी मागवून घेऊन त्याची नोंदणी करून पैसे घेऊन नागरिकांना लस देण्यात येत होती. पोलिसांनी आरोग्य सेवकास ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.