लस न घेता रस्त्यावर फिरणे महागात ! महिन्याभरात साडेसहा लाख रुपयांचा दंड मनपाने केला वसूल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरात गेल्या काही दिवसात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घ्या, अन्यथा दंड वसूल केला जाईल, असे आदेश प्रशासनाने काढले आहेत. तथापि, दंड भरू पण लस न घेता फिरू, असाच आविर्भाव सध्या नागरिकांचा आहे. महापालिकेने कोरोना प्रतिबंधाची लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्या एक हजार 262 नागरिकांकडून तब्बल सहा लाख 31 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लसीकरणाला गती देण्यासाठी प्रशासनाचे काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. पण अनेक जण अद्याप लस घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. ज्या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, तिथे जनजागृती केली जात आहे. त्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र त्यालाही नागरिक जुमानत नसल्याने ज्या नागरिकाने लसीचा एकही डोस घेतलेला नाही, अशा नागरिकांना रस्त्यावर अडवून पाचशे रुपयांचा दंड करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

महापालिका क्षेत्रात प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा व उपायुक्त सौरभ जोशी यांनी नागरिक मित्र पथकांच्या माध्यमातून शहराच्या विविध भागातील नागरिकांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासण्याची मोहीम सुरु केले आहे. 16 डिसेंबर 2021 ते 17 जानेवारी 2022 या एक महिन्याच्या काळात पंधरा नागरिक मित्र पथकांच्या माध्यमातून 75 हजार 50 नागरिकांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासण्यात आले. त्यात एक हजार 262 नागरिकांनी अद्याप लस घेतली नसल्याचे स्पष्ट झाले. या नागरिकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारून सहा लाख 31 हजार रुपये वसुल करण्यात आले. तसेच त्यांना लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहन करण्यात आले. लस न घेतलेल्या नागरिकांना दंड करण्याची कारवाई सुरुच राहील असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.