मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सरकार बनवण्याचे सगळे मार्ग खुले आहेत या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर ‘धक्कादायक’ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मागील १५ दिवस हे राज्याच्या राजकारणासाठी दुर्दैवी होती असं सांगतानाच उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी केलीच नव्हती असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मी उद्धव ठाकरेंना चर्चेसाठी अनेक फोन केले पण त्यांनी फोन घेतलेच नाहीत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा करायला वेळ होता, पण आमच्याशी बोलायला नव्हता याचं अतीव दुःख असल्याचं सांगितलं. शरद पवारांनीही सेना-भाजपने सरकार स्थापन करावी असं सांगीतल असताना शिवसेना मात्र त्याच्याशीच चर्चा करत राहिली या घटनेची खंतही फडणवीसांनी व्यक्त केली.
मागील १५ दिवसांत अत्यंत खालच्या पातळीवरची टीका शिवसेना नेत्यांनी केली. भाजपच्या मोठ्या नेत्यांचा मान त्यांनी राखला नाही हे दुर्दैवी असल्याचंही फडणवीस म्हणाले. शिवसेना ज्या भाषेत बोलली त्या भाषेत आम्हालाही बोलता आलं असतं पण आम्ही आमच्या मर्यादेत राहिलो. आमदार फोडण्याचा गलिच्छ आरोप आमच्यावर लावण्यात आला असून असा आरोप करणाऱ्यांना आरोप सिद्ध करण्याचा खुलं आव्हानही फडणवीसांनी दिलं.