सातारा प्रतिनिधी | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे त्यांच्या स्मारकाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देवून अभिवादन केले. याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवण्यात महात्मा जोतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे फार मोठे योगदान आहे. स्त्रीशिक्षण, महिला आणि विधवा/परितक्त्यांच्या अधिकारांसाठी संघर्ष हे आजच्या युगात सोपे वाटत असले तरी अतिशय कठीण काळात या दाम्पत्याने हे शिवधनुष्य पेलले होते. या देशाला त्यांनी दिलेली ही फार मोठी देण आहे
राज्याचे पुरोगामित्त्व कधीही मागे पडू देणार नाही. हे राज्य समतेच्या तत्त्वावरच चालेल. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठीची शिफारस केंद्राकडे केली आहे.
संत सावतामाळींचे आरण आणि महात्मा जोतिबांचे जन्मस्थान कटगुण या दोन्ही ठिकाणचा विकास करण्यात येईल. नायगावला सावित्रीसृष्टी उभारण्यात येईल,या क्षेत्राला ब क्षेत्र तीर्थक्षेत्राचा दर्जा,प्रस्ताव प्राप्त होताच देण्यात येईल, याठिकाणी महिलांसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येईल. भीडे वाड्यासंदर्भात सुद्धा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून स्मारकाची उभारणी करण्यात येईल.