हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयानंतर मात्र विरोधक आणि सत्तेतील महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं पाठबळ दिले असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि सेनेचे नेते विनायक राऊत यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.
याबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले,’ देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. राज्याला अधिकार नसताना कायदा केला मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपने पाठबळ दिले आहे. जी लोकं सरकारच्या विरोधात याचिका टाकत आहेत त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णया विरोधात याचिका केली असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे’.
या निकालानंतर आता केंद्राची जबाबदारी आहे. केंद्र सरकारने आता कायदा पारित करून मराठा समाजाला न्याय द्यायला पाहिजे. केंद्राकडून अजून मागासवर्गीय समितीची स्थापना करण्यात आली नाही ती लवकरात लवकर स्थापना करावी. आम्ही त्या समितीकडे मागणी करू असे मलिक यांनी सांगितले.तसेच पुढे बोलताना मलिक म्हणाले देवेंद्र फडणवीस हे राजकारण करत आहेत. या खटल्यामध्ये कोणतेही वकील बदलले नाहीत . चांगले वकील देण्यात आले आहेत ते दिशाभूल करत होते हा केंद्राचा नसून नवीन कायदा आहे. गायकवाड समितीचा अहवाल हा इंग्रजीत होता त्याचे भाषांतर कसे होणार होते राज्याला अधिकार नसताना कायदा कसा केला अशी टीका मलिक यांनी केली आहे.