फडणवीसांनी केली ठाकरेंची तुलना थेट गल्लीतल्या नेत्याशी; ‘त्या’ वक्तव्यामुळे राजकारण तापणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यातील विविध भागांमध्ये दौरे करत आहेत. आज त्यांचा दौरा धाराशीवमध्ये होते. येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मंत्री नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याची ऑफर दिली. यावरच प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरेंना गल्लीतील नेत्याची उपमा दिली आहे. तसेच, त्यांना खोचक टोला देखील लगावला आहे. ज्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ज्या पक्षाचा अगोदरच बँडबाजा वाजला आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींसारख्या नेत्यांना ऑफर देणे म्हणजे गल्लीतल्या नेत्याने मी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती करतो असे सांगण्यासारखं आहे. नितीन गडकरी हे महाराष्ट्रातल्या नागपूरमधून लढतात, ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पहिली यादी आली त्यात महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याचं नाव नव्हतं”

त्याचबरोबर, “पहिल्या यादीवेळी महाराष्ट्राचा निर्णय झाला नव्हता, त्यामुळे आम्ही ती चर्चा केली नाही. महायुतीचा निर्णय होऊन महाराष्ट्रातल्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळी सर्वात आधी नितीन गडकरींचं नाव येईल. त्यामुळे मला वाटतं स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

उद्धव ठाकरेंची ऑफर काय होती?

नितीन गडकरी यांना ऑफर देताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “अहो नितीन जी सोडून द्या भाजप आणि राहा उभं, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो. महाराष्ट्राचं पाणी दाखवा, महाराष्ट्राची धमक दाखवा. महाराष्ट्र दिल्ल समोर कधीही झुकला नाही. आज मी नितीन गडकरी यांना जाहीर सांगत आहे की, राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींना खुली ऑफर दिली होती.