सातारा | कोरेगाव तालुक्यातील चंचळी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या छबिन्या पुढे लेझीम खेळताना हृदयविकाराचा झटक्याने सेवानिवृत्त सहाय्यक फौजदाराचा मृत्यू झाला. दशरथ मारुती कदम (वय- 71) असे मृताचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, श्री. भैरवनाथ देवाच्या छबिन्यासमोर लेझीम खेळून झाल्यानंतर दशरथ कदम एका जागी जाऊन बसले, त्यातच त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कदम यांच्या मृत्यूनंतर तात्काळ छबिना थांबविण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला. सोमवारी सकाळी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
दशरथ कदम यांनी राज्य पोलीस दलात शिपाई म्हणून सेवेस प्रारंभ केला. हवालदार व सहाय्यक फौजदार म्हणून त्यांनी कोल्हापूरसह पाचगणी, पुसेगाव व वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात उत्कृष्ट सेवा बजावली. त्यांच्या कामाची दखल घेऊन वेळोवेळी पोलीस दलाने त्यांचा सन्मान देखील केला होता.