कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत असणाऱ्या दातार मळा इथं एका कारखान्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच त्यांच्या जवळ असणाऱ्या १० लाख १ हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
जीवन वरुटे, सागर कडलगे, रोहित कांबळे अशी मुख्य संशयितांची नावे आहेत. हे आरोपी एका कारखान्यात गेल्या तीन महिन्यांपासून बनावट नोटा छापून दैनंदिन व्यवहारात खपवत आहेत. अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि ही धडक कारवाई केली. अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.