कोल्हापूर प्रतिनिधी । एका उच्चशिक्षित तरुणीबरोबर लग्न लावण्याचा बनाव करत, बनावट पालक व खोटी कागदपत्रे तयार करून ७ जणांच्या टोळीने येथील एका कापड व्यापाऱ्याची सोने, चांदी आणि रोख रकमेसह ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कापड व्यापारी भैरूलाल शांतिलाल भंडारी (वय ३५, आझाद चौक) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी भंडारी यांच्या तक्रारीवरून आरोपी म्हणून प्रकाश लोढा (वय ५८ , रा. बेंगळूर), दीपक जैन ऊर्फ दीपक शेळके (वय ३६, रा. श्रीरामपूर), मुलीचे वडील अंकित गुंदेशा म्हणून हजर असलेल्या व्यक्तीचे नाव सत्यजित (वय ४९, अहमदनगर), जितेंद्र गुंदेशा ऊर्फ सचिन ब्राह्मणे (वय ३६, श्रीरामपूर), पूनम गुंदेशा ऊर्फ पूनम साळवे (वय २७, श्रीरामपूर), कल्याणी गुंदेशा ऊर्फ कल्याणी साठे (वय २६, श्रीरामपूर) व प्रियंका जैन (वय २७, रोहा ) यांच्याविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान ”बनावट कागदपत्रे तयार करून विश्वास मिळवायचा आणि एकाच मुलीची तीन-तीन लग्ने करून होणाऱ्या नवऱ्याकडून लाखो रुपयांची मागणी करायची. त्याच्याबरोबर चार – पाच महिने राहून भांडण काढून तेथून निघून जाऊन त्या मुलीचे दुसरे लग्न करून भावी नवऱ्याची फसवणूक करण्याचा कट रचणे अशी गुन्ह्याची पद्धत आहे” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.