सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
मी माझ्या वाॅर्डाचा लोकप्रतिनिधी आहे. केवळ निवडणूक जवळ आल्याने माझ्यावर घाणेरडे आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांच्या कामासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत, राहणार आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने माझ्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा पूर्ण तपास करावा, माझा न्यायालयन बाबींवर पूर्ण विश्वास असल्याचे नगरसेवक रविंद्र ढोणे यांनी सांगितले.
सातारा येथे शहरातील मंगळवार पेठेत असणाऱ्या जागेत खोदकाम करत जमिनीचे नुकसान केल्याप्रकरणी शाहुपूरी पोलिस ठाण्यात सातारा पालिकेचे नगरसेवक रविंद्र निवृत्ती ढोणे यांच्यासह तीन जणांवर ॲट्रासिटी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या संदर्भात रविंद्र ढोणे पत्रकारांशी बोलत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीचे नगरसेवक आहेत. सातारा नगरपालिकेची निवडणूक काही दिवसावर आल्याने सातारा शहरात चांगलेच राजकीय वातावरण तापू लागले आहे.
रविंद्र ढोणे म्हणाले, यापूर्वी माझ्यावर असे बरेच प्रयत्न करण्यात आले आहेत. पुढील काही दिवसात निवडणूक आल्याने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझी बदनामी करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या मागे बोलवता धनी वेगळाच आहे. तेव्हा पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. काही समाजकटंक या कायद्याचा चुकीचा वापर करत आहेत.