यंत्रणांना जबाबदारी घ्यावीच लागेल..; नदीत तरंगणारे मृतदेह पाहून फरहान व परिणीतीने व्यक्त केला संताप

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच गंगा नदीत तरंगणाऱ्या मृतदेहांसंबंधित एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. गंगा आणि अन्य नद्यांत तरंगणारे हे मृतदेह पाहून कुठल्याही संवेदनशील मनाला बोचरे घाव जाणवणार हे निश्चित आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी या संदर्भात सरकारला चांगलाच खडसून जाब विचारला. तर आता अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनीही नद्यांमधील या तरंगत्या मृतदेहांना पाहून सरकारी यंत्रणांबाबत चांगलाच संताप व्यक्त केला आहे. यामुळे नद्यांचे जे नुकसान होईल, त्याला जबाबदार कोण? असा खडा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. इतकेच नव्हे तर यंत्रणांना या सर्व प्रकारची जबाबदारी घ्यावीच लागेल असेही म्हटले आहे.

फरहान अख्तर आपल्या ट्विटमध्ये म्हणाला, हे भयंकर…’नदीत तरंगणारे आणि काठांवर वाहून येणारे मृतदेहांचा आकडा भयंकर आणि मन हेलावणारा आहे. एक ना एक दिवस व्हायरसचा खात्मा होईलच. पण यंत्रणांना या अपयशाची जबाबदारी घ्यावीच लागेल,’. तर परिणीती चोप्राने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, ‘नदीत तरंगणारे ते मृतदेह कुणाच्या आईचे, कुणाच्या लेकीचे, कुणाच्या पित्याचे, कुणाच्या मुलाचे होते. तुम्ही त्या नदीकाठी उभे आहात आणि तुमच्या आईचा मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगताना दिसला तर तुमची काय अवस्था होईल? अकल्पनीय.. राक्षस

बिहार, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांसह देशातील अन्य राज्यांच्या नद्यांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात मानवी मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत. बिहार सरकारने दिलेल्या माहितीनुसार, बक्सरमध्ये गंगेत ७१ मृतदेह आढळले आहेत. तर उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये २५ मृतदेह तरंगताना आढळले. इतकेच नव्हे तर, मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील नदीतही अनेक मृतदेह असेच बेवारस तरंगताना आढळून आले. नदीत अशाप्रकारे मृतदेह वाहून येत असल्यामुळॆ निश्चितच लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय कोरोनाचा धोकाही प्रचंड वाढला आहे. हे मृतदेह कोरोना रूग्णांचे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर फरहान आणि परिणीती या दोघांनीही वरील ट्विट केले आहेत.

You might also like