कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंधकर
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या बाळासाहेब शामराव बलुगडे (वय ५८) यांचा उसाच्या फडाला लागलेल्या आगीमुळे होरपळून मृत्यू झाला. ही घटन तांबुळ नावाच्या शेतात घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने बिद्री साखर कारखान्याच्या शेती अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत संताप व्यक्त केलाय.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात तुरंबे येथे बलुगडे यांचे दूधगंगा नदी जवळ ताबुळ नावाचे शेत आहे. आज सकाळी या शेतातील उसाच्या फडाला आग लागली. या आगीत सुमारे दहा एकरातील ऊस जळून खाक झाला. ही आग अत्यंत तीव्र होती. यावेळी उसाच्या फडाला लागलेली आग विझविण्यासाठी ग्रामस्थांसह बाळासाहेब बलुगडे या ठिकाणी गेले होते. आपल्या शेतातील फडाची आग विजवताना आगीच्या ज्वाळांनी ते होरपळले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बलुगडे यांचा ऊस हा बिद्री साखर कारखान्याला पाठविला जातो. कारखान्याचा ऊस तोडणी कार्यक्रम सुरळीत नसल्यामुळे तुरंबे येथील सुमारे दोन हजार टन ऊस शिल्लक आहे. कारखाना व्यवस्थापनाचे दुर्लक्ष आहे. आज या घटनेनंतर कारखान्याचे शेती अधिकारी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी आले होते. ऊस कारखान्याने वेळेत ऊस उचलला नसल्यानेच ही घटना घडली असा आरोप करत जमावाने त्यांना जाब विचारत धक्काबुक्की केली. काही आक्रमक युवकांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्नदेखील केला.
या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. बलुगडे यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. बलुगडे हे ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच विविध संस्थांचे मार्गदर्शक म्हणून काम पाहत होते.