पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वीकारली आहे. शेट्टी यांनी आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून विधान परिषेदत प्रतिनिधित्व करण्यास होकार कळवला आहे.
शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी शेट्टी यांनी पवारांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. तर शेट्टी यांच्यासोबत संघटनेचे स्थानिक नेते सतीश काकडे तसेच राजेंद्र ढवाणही होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात शेट्टी व पवार यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर खास फोटोसेशनही झालं. या चर्चेत शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून आलेला आमदारकीचा प्रस्ताव मान्य केल्याचे स्वाभिमानी संघटनेकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता राजू शेट्टी आमदार होण्याची औपचारिकता शिल्लक आहे.
विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. मात्र सत्ता आल्यानंतर या दोन्ही पक्षांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेककडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून नाराजीचा सूर होता. नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला संधी देण्यात आली नाही. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला संधी मिळावी असा मेल शेट्टी यांनी पवार यांना केला होता. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीने आता संधी देऊन न्याय दिला.
दरम्यान, राज्यात विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त आहेत. या जागांपैकी राष्ट्रवादीच्या वाट्याला ४ जागा येणार आहेत. या ४ जागांपैकी राष्ट्रवादीकडून एका जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना आमदार होण्याची ऑफर देण्यात आली होती. शरद पवार यांच्या सांगण्यावरून खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हा प्रस्ताव घेऊन राजू शेट्टी यांच्या घरी गेले होते. मात्र शेट्टी यांनी लगेचच कोणताही निर्णय घेतला नव्हता. या प्रस्तावाबाबत स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते व राज्य व्यवहार समिती निर्णय घेईल असे शेट्टी यांनी पाटील यांना सांगितले होते.
शेतकऱ्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी राजू शेट्टी यांच्यासारख्या आक्रमक व अभ्यासू नेत्यानेच प्रतिनिधित्व करावे, असा आग्रह संघटनेतून धरला गेला आणि त्या आग्रहातूनच शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा प्रस्ताव स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. शेट्टी विधान परिषदेत असल्यास त्यांच्या अनुभवाचा महाविकास आघाडीला फायदा होईलच शिवाय शेतकऱ्यांच्या हिताचेही अनेक प्रश्न सोडवले जातील, अशी संघटनेला आशा आहे.
त्याचप्रमाणे नीती आयोगामार्फतच्या इनोव्हेशन सेंटरच्या प्रकल्पाची माहिती घेतली. फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन व कृषी क्षेत्रातले नवउद्योजक यांना या सेंटरमार्फत मार्गदर्शन केलं जातं.#Baramati @supriya_sule pic.twitter.com/9wHkM6A3PM
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 16, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”