हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सातत्याने सरकारला लढा देणारे शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना त्यांच्यावरील प्रेमापोटी शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून फॉर्च्युनर कार गिफ्ट देण्यात आली आहे. राजू शेट्टी यांनी स्वतः सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे.
आजपर्यंत कोणालाही विकलो गेलो नाही. इथून पुढेही विकलो जाणार नाही. चळवळीत आणि राजकारणात काम करत असताना जनतेशी प्रामाणिक राहिल्याबद्दल तुम्ही लोकवर्गणीतून जे बक्षिस दिले आहे त्याचा मी कृतज्ञपूर्वक स्वीकार करतो, असे म्हणत राजू शेट्टी यांनी आभार मानले आहेत.
राजू शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सातत्याने राज्य आणि केंद्र सरकार विरोधात लढा दिला आहे. अनेक आंदोलन करून त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, यापूर्वी देखील शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांना आर्थिक मदत केली होती. राजू शेट्टी यांनी 2009 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली तेव्हाही शेतकऱ्यांनीच लोकवर्गणी काढून त्यांना आर्थिक पाठबळ दिले होते.