सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. या पावसाच्या माऱ्यामुळे सडलेली आणि नरम पडलेली स्ट्रॉबेरी अक्षरशः बांधावर फेकून द्यावी लागली आहे. महाबळेश्वरच्या शिवारात सध्या स्ट्राॅबेरीचा सिझन चालू आहे, मात्र अवकाळीच्या तडाख्याने स्ट्राॅबेरी फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर आलेली आहे.
महाबळेश्वरच्या शिवारात फिरताना सध्या स्ट्रॉबेरीचा खच पडलेला पहायला मिळत आहे. राज्यावर आलेल्या अवकाळी पावसाच्या संकटाने आता स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना तडाखा दिला आहे. अवकाळी पाऊस पडून चार ते पाच दिवस झाले असून, वातावरण पूर्णतः बदलून गेलं आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जावळी तालुक्यातील भुतेकर, पाचगणी, भिलार परिसरातील अनेक हेक्टरावरील स्ट्रॉबेरी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे
अवकाळी पावसानंतर शेतातच स्ट्रॉबेरी सडली आहे. काही ठिकाणी स्ट्रॉबेरी खराब झाली आहे. अशा किमान 50 एकरहून अधिक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी ही बांधावर टाकून दिली आहे. करोडो रुपयांचे नुकसान जावळी, महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे. या स्ट्रॉबेरीचे नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असले तरी जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाहीत. स्वतः साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महाबळेश्वर मध्ये जावून शेतकऱ्याची भेट घेवून स्ट्रॉबेरीच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे.