सांगली प्रतिनिधी । जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर शेतकरी उध्वस्त झाल्यानंतरही संथ गतीने पंचनामे सुरु आहेत. फुलोऱ्यातील बागात वाचलेले दहा-बारा घडही जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. यामागे किमान औषधाचा खर्च तरी निघावा, असे अपेक्षीत आहेत. वादळी पावसाने द्राक्ष बागांचे प्रथम दर्शनी 30 हजार एकरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाऊस थांबून आठ दिवसांचा कालावधी लोटला तरी आत्तापर्यंत सुमारे 10 हजार एकरावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. अद्यापही 20 हजार एकरावरील पंचनामे प्रलंबित असून महसूल आणि कृषी विभागाचा अजब कारभार उघडकीस आला आहे.
दहा दिवसांपूर्वी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले होते. जिल्ह्यातील पूर्व भागासह पूर्ण जिल्ह्यातील काढणीला आलेले आणि फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांचे पावसाने मोठे नुकसान झाले. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असून, द्राक्षांचे घड कुजले. रब्बीच्या पिकांनाही पावसाचा फटका बसला. भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या दणक्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, वाळवा, मिरज, कडेगाव, पलूस, जत तालुक्यांतील 384 गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अवकाळी पावसामुळे नऊ तालुक्यातील 384 गावांमधील 26 हजार 842 शेतकऱ्यांच्या 11 हजार 939 हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबांगांचे मोठे नुकसान झाले आहे.
शासनाकडे पाठविलेल्या अहवालानुसार दहा हजार 639 हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष बागांचे 50 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांचे सुमारे 4 हजार कोटींचे नुकसान झाले. जिल्हा अधिक्षक कृषी विभागाने प्राथमिक पाहणी करुन राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. कृषी विभागाकडून पंचनामे करण्यासाठी सोमवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र पंचनाम्याची गती अतिशय संथ आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे, मात्र कृषी विभागाला अद्यापही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसते. तसेच पंचनाम्याची जबाबदारी महसूल आणि कृषी विभागाची आहे, परंतू दोन्ही विभागामध्ये समन्वयाचा अभाव पहायला मिळत आहे. त्यामुळे पंचनाम्यामध्येही कृषी विभागाचा अजब कारभार दिसून येत आहे.