गाझीपूर सीमेवर सुप्रिया सुळेंसहीत १५ विरोधी खासदारांना पोलिसांनी अडवलं; शेतकऱ्यांच्या भेटीसाठी होते जात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर गेल्या ७२ दिवसांपासून आंदोलनात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या सुप्रिया सुळेंसहीत १५ विरोधी पक्षाच्या खासदारांना पोलिसांकडून अडवण्यात आलं. अडवण्यात आलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, द्रमुक खासदार कनिमोळी, अकाली दल खासदार हरसिमरत कौर बादल,खासदार तिरुचि शिवा, सौगत राय यांचाही समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गाझीपूर सीमेवर निघताना सुप्रिसा सुळे ‘एएनआयशी’ बोलताना म्हणाल्या, ”मी शेतकऱ्याची लेक आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांरोबर ज्या प्रकारे वागतंय ते पाहून दु:ख होतं. मराठीमध्ये एक म्हण आहे अन्नदाता सुखी भव:, परंतु आज अन्नदाताच आंदोलन करतोय. मी केंद्र सरकारला एक विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांना न्याय द्यावा, असं सुप्रिसा सुळे यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातही एक आंदोलन झालं. अतिषय चांगल्या प्रकारे हे आंदोलन पार पडलं. केंद्र सरकार ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करतंय अशा परिस्थितीत बळीराजाला सध्या आधाराची गरज आहे. आज गाझीपूरला जाऊन मी शेतकऱ्यांशी आणि शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून बळीराजा ठाण मांडून बसलाय. आम्ही जरुर शहरात राहिलोय, वाढलोय, शिकलोय परंतु आमचं शेतकऱ्यांशी जे नातं आहे ते ईश्वर आणि भक्ताचं नातं आहे. शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं. पण आज अन्नदाताच आंदोलनाला बसलाय. त्याच अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी एक शेतकऱ्याची लेक म्हणून मी गाझीपूरला जातेय, असं सुळे म्हणाल्या.

दरम्यान, केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करत आंदोलनावर बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न या खासदारांकडून करण्यात आला. परंतु, नेत्यांना पोलिसांनी बॅरिकेडिंग पार करून आंदोलन स्थळावर जाण्याची परवानगी नाकारण्यात आली, असं हरसिमरत कौर बादल यांनी म्हटलंय.

‘समान विचारधारा असणाऱ्या पक्षांसोबत अकाली दल गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचारांची निंदा करत आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या खासदारांनाही रोखण्यात येतंय, शेतकऱ्यांना भेटू दिलं जातं नाही. लोकशाहीसाठी हा एक काळा दिवस आहे’ असं ट्विट हरसिमरत कौर यांनी केलंय.

शिरोमणी अकाली दल (SAD), द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि तृणमूल काँग्रेससहीत इतर पक्षांचे १५ खासदार गाझीपूर सीमेवर दाखल झाले होते. यात नॅशनल कॉन्फरन्स, क्रांतिकारी सोशलिस्ट पार्टी (RSP) आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML) या पक्षांच्या सदस्यांचाही यात समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.