नवी दिल्ली । गेल्या २९ दिवसांपासून शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. मोदी सरकारने नवे कृषी कायदे केवळ मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी आणले असल्याचा थेट आरोप शेतकरी करतायत. यात सर्वात आघाडीवर अदानी आणि अंबानी हे कॉर्पोरेट घराणे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे मोदी सरकार आपले कृषी कायदे रद्द करण्याच्या कुठल्याच मूड नसल्याचे वारंवार स्पष्ट करत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांना तीव्र विरोध करत आता थेट मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स जिओला’ (Reliance Jio) फैलावर घेतलं आहे. दिल्लीच्या सीमेवर काही दिवसांपूर्वी आंदोलक शेतकऱ्यांनी रिलायन्स जिओचे सिम कार्ड जाळून निदर्शने केले होते. तर आता हे आंदोलक जिओच्या टावरची वीजही तोडत आहेत.
पंजाब आणि हरियाणातील वे गवेगळ्या जिल्ह्यांतून रिलायन्स जिओच्या टावरचे वीज कनेक्शन तोडले जात असल्याचे वृत्त आहे. हरियाणातील सिरसासह इतर काही जिल्ह्यांतील नागरिक जिओ टावरचे वीज कनेक्शन तोडून आपला विरोध दर्शवत आहेत. मात्र, यासंदर्भात रिलायन्स जिओकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, शेतकरी आंदोलनामुळे रिलायन्स जिओचे आव्हान वाढले आहे. काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओने आपल्या प्रतिस्पर्धक कंपन्या भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया लि. (व्हीआयएल)वर शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही केला होता. आरोपानुसार, एअरटेल आणि व्हीआयएल दावा करत आहेत, की जिओचा मोबाईल नंबर त्यांच्या नेटवर्कवर पोर्ट करणे, हे शेतकरी आंदोलनाला समर्थन असेल.
नव्या कनेक्शन्सच्या बाबतीत एअरटेलने टाकले Jioला मागे
नवे मोबाईल ग्राहक जोडण्याच्या बाबतीत सुनील मित्तल यांच्या एअरटेलने रिलायन्स जिओला मागे टाकले आहे. रिलायन्स जिओ मागे पडण्याचा हा सलग दुसरा महिना आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यातही एअरटेलने किमान चार वर्षांनंतर नव्या कनेक्शन्सच्या बाबतीत जिओला मागे टाकले होते. ट्रायच्या अहवालानुसार, सुनील भारती मित्तल यांच्या कंपनीने ऑक्टोबर महिन्यात 36.7 लाख ग्राहकांना जोडले होते. यामुळे त्यांच्या मोबाईल कनेक्शन्सची संख्या वाढून 33.02 कोटींवर पोहोचली आहे. यानंतर जिओने 22.2 लाख नवे मोबाईल ग्राहक जोडले. त्यांच्या कनेक्शन्सची संख्या 40.63 कोटी झाली आहे. महत्वाचे म्हणजे जिओ 2021मध्ये 5जी टेक्नॉलॉजीमध्ये येण्याचा विचार करत असतानाच त्यांच्यासोबत हे सर्व घडत आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’