हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या घातक विषाणूशी लढत असताना भारतातील शेतकऱ्यांना आता एका नवीन अडचणीला सामोरं जावं लागत आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या शेतातील पिकांवर आलेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत.
संचारबंदीची आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोर करुनसुद्धा त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. असं असतानाच महाराष्ट्रातील टोमॅटो पिकावर एका अनोळख्या विषाणूने मारा केल्याचं दिसून येत आहे. अहमदनगर, नाशिक आणि पुणे भागातील जवळपास ६०% पिकांचं मागील १० दिवसांत नुकसान झालं असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
या विषाणूमुळे टोमॅटोचा लाल रंग पिवळा-काळा होतोय. त्याशिवाय तयार टोमॅटोमध्ये काळ्या रंगाचा डाग तयार होत आहे. गंभीर बाब म्हणजे किटकनाशकं मारुनही हा रोग आटोक्यात येत नाही. टोमॅटोचा रंग बदलला असल्याने ग्राहक, व्यापारी माल घेत नसल्याचं, मोठं नुकसान होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. टोमॅटोच्या बियाणांमध्ये दोष होता का, याबाबत कृषी विभागाने शोध घेण्याची मागणी किसान सभेने केली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापिठाने टोमॅटोचे सॅम्पल गोळा केले असून ते बंगळुरुला पाठवण्यात येणार आहेत. सॅम्पल तपासून जो अहवाल येईल त्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे.