यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – सुनेच्या सततच्या त्रासाला कंटाळून यवतमाळमध्ये सासर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना यवतमाळमधील लोहारा एमआयडीसी परिसरातील स्वराज ट्रॅक्टर वर्कशॉप या ठिकाणी घडली आहे. मृत्यूपूर्वी सासऱ्याने एक चिट्ठी लिहिली होती. या चिट्ठीमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव साहेबराव दवणे असे आहे.
साहेबराव दवणे हे आपला मुलगा आणि सून यांच्यासोबत राहत होते. ते एका ट्रॅक्टर वर्कशॉपमध्ये चौकीदारीचे काम करत होते. त्यांनी 4 बचतगटाचे कर्ज उचलून मुलगा सूरजचा विवाह नांदेड येथील संध्या हिच्याशी लावून दिला होता. संध्या सून बनून घरी आल्यानंतर तिने वृद्ध सासऱ्याला घालून पाडून बोलण्यास सुरुवात केली. लग्नासाठी काढलेला कर्जाचा हप्ता नवऱ्याने भरू नये यासाठी ती नवऱ्यावर दबाव टाकत होती.
सून संध्या सासऱ्याला अश्लील शिवीगाळ करत जेलमध्ये टाकण्याची धमकी देत होती. यामुळे साहेबराव दवणे यांना मानसिक धक्का बसला. या धमक्यांना वैतागून अखेर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी चिट्ठी लिहिली होती. या चिट्ठीवरून त्यांचा मुलगा सुरज साहेबराव दवणे याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी संध्या सूरज दवणे हिच्याविरुद्ध गुन्हा केला.