नाशिक प्रतिनिधी | जन्मदेता बापच मुलांचा वैरी झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे गावात हि घटना घडली असून मुलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर विषाचा बराचसा अंश पोटात गेल्याने मुलांची परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
शाळा सुरु होऊन जवळपास महिना उलटला तरी शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना सदर पित्याने अदयाप वह्या पुस्तकं घेतली नव्हती. त्यामुळे मुलीने वडिलांकडे वह्या पुस्तकासाठी पैसे मागणीतले. ज्यावेळी मुलीने वडिलांकडे पैसे मागितले तेव्हा वडील दारू पिलेले होते. त्यांनी पैसे मागणाऱ्या मुलीच्या तोंडात घरात असणारे कीटक नाशक ओतण्याचा प्रयत्न केला. आपल्या बहिणीला वडील जीव मारत आहेत असे लक्षात येताच त्या व्यक्तीचा मुलगा मध्ये पडला असता त्याच्या तोंडात देखील वडिलांनी कीटक नाशक ओतले.
मुलांचा आरडा ओरडा ऐकून घराच्या शेजारी राहणारे लोक गोळा झाले. गोळा झालेल्या लोकांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटना स्थळी दाखल होण्याची वाट नबघता शेजाऱ्यांनी त्या मुलांना रुग्णालयात हलवले. सध्या त्या दोन्ही मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.