सांगली : मिरज तालुक्यातील अंकली येथे कृष्णा नदीमध्ये पोहताना बुडत असलेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मलकाप्पा काशिनाथ आसंगी (वय ४५, रा. अंकली) असे मृताचे नाव आहे. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. सांगली ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी तीनच्या सुमारास मृत मलकाप्पा यांचा मुलगा अमित (वय १४) हा आपल्या मित्रासह पोहण्यासाठी कृष्णा नदीमध्ये गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. ही बाब मलकाप्पा यांच्या लक्षात येताच त्यांनी पाण्यात उडी घेत त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. यात अमित व त्याचा मित्र सुरक्षितपणे बाहेर आले. मात्र, त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात मलकाप्पा पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आसंगी यांच्या शोधासाठी आयुष हेल्पलाईनसह मदतीसाठी पथक दाखल झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर आसंगी यांचा मृतदेह हेल्पलाईनला सापडला. हेल्पलाईनचे प्रमुख अविनाश पवार, अमोल व्हटकर, चिंतामणी पवार, यश मोहिते आदींनी शोध मोहिमेत भाग घेतला.
त्यानंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी तो नेण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होते. त्यांनी आसंगी यांचा मुलगा अमित यास उपचारासाठी सांगलीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.