कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
बेलवडे ब्रूद्रुक येथील शेरी शिवारात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात कुत्रे ठार झाले आहे. गुरुवारी 28 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सदर घटना कैद झाली आहे. याबाबत वनविभागाला कल्पना देण्यात आली. वनविभागाने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बेलवडे ब्रूद्रुक येथील शेरी शिवारात
महेश बाळासो मोहिते यांचे अथर्व पोल्ट्री फॉर्म आहे. या शेडवर बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने गुरुवारी 28 रोजी रात्री 1 वाजून 54 मिनिटांनी हल्ला केला. या हल्ल्यात कुत्रे जागीच ठार झाले आहे.
शुक्रवारी 29 रोजी सकाळी ही घटना निदर्शनास आली.ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यानंतर याबाबत वनविभागाला कल्पना देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/1115404978959280
बिबट्याने कुत्र्यावर केलेल्या हल्ल्याची घटना पोल्ट्रीवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे बेलवडे बुद्रुक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बेलवडे बुद्रुक येथील इथुली शिवारातील वस्तीवरही बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून कुत्रे ठार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर काही दिवसातच ही दुसऱ्या घटना घडल्याने शेतकऱ्यांना रात्री-अपरात्रीसह भर दिवसाही शेत-शिवारात जाण्यासाठी भीती वाटत असून शेतीच्या कामांचा खोळंबा होत आहे.
बिबट्याचा बेलवडे बुद्रुकसह कालवडे, कासारशिरंबे, कासेगाव, वाठार, काले परिसरात वावर असून बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत अनेक कुत्री, शेळ्यांवर हल्ला केला असून त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे वनविभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. मात्र, वनविभागाकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.