औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशातच समृद्धी महामार्गाच्या कामावरील मजुराच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी 80 हजाराला चुना लावण्याची घटना उघडकीस आली आहे. विनोद भीमराव शहाणे (41) असे फसवणूक झालेल्या मजुराचे नाव आहे.
त्यांनी दोन दिवसांपूर्वीच क्रेडिट कार्ड घेतले होते. त्यावर एकही व्यवहार केलेला नाही. त्यामुळे सायबर भामट्याने मिस कॉल केले होते. त्यावर संपर्क साधला असता महिलेने मी बँकेतून बोलत आहे. तुम्ही व्यवहार का केला नाही, त्यामुळे दोन हजाराचा दंड होऊ शकतो. अशी भीती दाखवीत ओटीपी नंबर विचारून खात्यातील 79 हजार 14 रुपयांचा व्यवहार करून फसवणूक केली.
त्या महिलेने सहा वेळेस सतत फोन करून माहिती मागितली. काही वेळाने लँडलाईन फोन वरून एक कॉल आला की तुम्ही हा व्यवहार केला आहे का, तेव्हा त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. बँकेत जाऊन तक्रार अर्ज दिला असून फुलंब्री पोलीस ठाण्यातही तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फुलंब्री ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदीराज अधिक तपास करत आहेत.