महिला वन कर्मचाऱ्याचा कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा अमरावतीमधील घटना

Amravati
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यामधील परतवाडा या ठिकाणच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका महिलेने चक्क कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाची माहिती मिळतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतरसुद्धा त्या महिलेने धिंगाणा घातला. दारूच्या नशेत तिने तिला अटक करायला आलेल्या महिला पोलिसावर हात उगारला. या प्रकरणी त्या महिलेवर परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण
ही महिला परतवाडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात लेखा विभागात काम करत आहे. तिने बुधवारी दारू पिऊन कार्यालयात धिंगाणा घातल्याने सारेच कर्मचारी अवाक् झाले. बाकी कर्मचाऱ्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने कोणाचेच ऐकले नाही. अखेर शेवटी पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर महिला पोलीस पथक तिकडे दाखल झाले. महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्या पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तिला गाडीत बसवले पण ती त्यानंतर बाहेर आली आणि पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता तिने महिला पोलिसाला कानाखाली मारली.

या प्रकारानंतर पोलिसांनी आपला हिसका दाखवत तिला ताब्यात घेतले आणि तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर वनविभागात सेवेत असलेल्या महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कामाच्या ठिकाणी महिलांना संरक्षण मिळावे, वरिष्ठांकडून त्यांचा छळ होऊ नये यासाठी शासनस्तरावर अनेक पावले उचलण्यात येत आहेत.