हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पश्चिम बंगालमधून एक खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. याठिकाणी तुरुंगातील कैदी महिला गर्भवती राहिल्या आहेत. परंतु हे नेमके कसे घडले? याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना देखील माहित नाही. त्यामुळे आता कोलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. नुकताच न्यायालयात एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये तुरुंगातील 196 मुले असल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे, या सुनावणीनंतर न्यायालयाने कैदी महिलांच्या कोठडीत काम करण्यास पुरुष कर्मचाऱ्यांवर बंदी घातली आहे.
सध्या पश्चिम बंगालमध्ये ही घटना उघडकीस आल्यामुळे अनेक चर्चांना देखील उधाण आले आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील बोट ठेवण्यात येत आहे. नुकत्याच सादर झालेल्या अहवालात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधील विविध तुरुंगात जवळपास 196 मुले राहत आहेत. अलीपुर येथील तुरुंगात पंधरा मुले आहेत त्यातील दहा मुलं आणि पाच मुली आहेत. काही महिलांनी खुलासा केला आहे की त्यांनी सुधार गृहातच मुलांना जन्म दिला आहे. परंतु त्यांच्याकडून देखील या मुलांचे वडील कोण हे सांगण्यात आलेले नाही.
बंगालमध्ये घडलेल्या या घटनेमुळे कैदी महिलांवर शारीरिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे न्यायालयात झालेल्या या सुनावणीनंतर, कैदी महिलांच्या कोठडीत पुरुषांनी काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोणत्याही महिलेला कोठडीत ठेवण्यापूर्वी तिची चाचणी करण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर 196 मुलांचे वडील कोण आहेत याचा पोलिसांनी तपास घ्यावा आणि या प्रकरणाला गांभीर्याने अशा सूचना देखील न्यायालयाने दिल्या आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.