लोणंद | फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथील विठ्ठल बिरदेव मंदिराजवळ तिघांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यात खंडाळा तालुक्यातील निंबोडी येथील सरपंचासह सहा जणांवर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, निंबोडी येथील फिर्यादी संदीप शेळके हे आदर्की येथून वडील बिराजी व चुलतभाऊ तानाजी यांच्यासमवेत घरी जात होते. तेव्हा गणेश शेळके याने फोन करून संदिपला मंदिराजवळ थांबण्यास सांगितले. गाडीतून आलेल्या 5 ते 6 जणांनी गणेशला शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये निंबोडीचे सरपंच सुजित अर्जुन शेळके, अमोल माणिक शेळके, नाना भिवाजी शेळके, मेघराज रंगराव शेळके, सुभाष सदाशिव शेळके यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली. सोडवण्यास आलेल्या बिराजी व तानाजी यांनाही मारहाण केली.
यावेळी मारहाण करणाऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली, तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन सर्व जण तेथून निघून गेले. या प्रकरणी गणेश सोफ शेळके (वय- ३०), सुजितसिंह अर्जुन शेळके (वय- ३०), अमोल माणिकराव शेळके (वय- ३२), दीपक ऊर्फ नाना भिवाजी शेळके (वय- ४०) यांना अटक करण्यात आली. पोलिस नाईक ज्ञानदेव साबळे हे अधिक तपास करत आहेत.