ओगलेवाडीत ऊसतोडणी मजूरांमध्ये हाणामारी, तिघांना अटक

कराड | कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथील चौकात तीन ऊसतोडणी मजूरांमध्ये किरकोळ कारणावरुन आपसात हाणामारी झाली. शनिवारी 27 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तिघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ऊस तोडणी कामगार नवनाथ काळे (रा. श्रीगोंदा, अहमदनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, किरकोळ कारणावरुन ऊस तोडणी मजूर नवनाथ काळे यास त्याचे नातेवाईक ऊस तोडणी कामगार ज्ञानेश्वर चव्हाण, शिलिंदर चव्हाण, गणेश जायभाई (रा. सर्व श्रीगोंदा, अहमदनगर) यांनी संगनमत करुन मारहाण केली. यामध्ये नवनाथ काळे हा जखमी झाला.

त्याच्या फिर्यादीवरुन पोलिसांकडून तीन जणांविरुध्द गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत आहेत. दरम्यान, ऊस तोडणी टोळ्यांचे मुकादम, कारखाना अधिकारी यांनी बाहेरील ऊस तोडणी कामगार यांना वेळोवेळी सूचना देऊन असे प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

तसेच बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या ऊस तोडणी कामगारांची संपुर्ण माहिती पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी केले आहे.